Ad will apear here
Next
शनिवारवाड्याला २९१ वर्षे


मराठी साम्राज्याची शान असलेल्या आणि अटकेपार झेंडा फडकविणाऱ्या कर्तबगार पुरुषांची मालिका पाहण्याचे भाग्य लाभलेल्या शनिवारवाड्याच्या भूमिपूजनाला १० जानेवारी २०२१ रोजी २९१ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने शनिवारवाड्याबद्दलची ही माहिती...
..........
पराक्रमी थोरले बाजीराव पेशवे यांनी माघ शुद्ध तृतीया शके १६५१ या तिथीला म्हणजेच १० जानेवारी १७३० रोजी भूमिपूजन करून शनिवारवाड्याच्या बांधकामाचा प्रारंभ केला. पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण होऊन २२ जानेवारी १७३२ रोजी वाड्याची वास्तुशांत झाली. वास्तुशांतीला २३३ रुपये आठ आणे खर्च आला होता. तीनशे वैदिक ब्राह्मणांनी वास्तुशांतीचे धार्मिक विधी केले. हा वाडा शनिवार पेठेमध्ये असल्याने त्याचे नाव शनिवारवाडा असे ठेवले गेले. १७३२नंतरही या वाड्यात वारंवार नवीन बांधकामे, बदल होत राहिले. बुरुजाचे दरवाजाचे काम होण्यास १७६० हे वर्ष उजाडले. शिवराम कृष्ण लिमये उर्फ खासगीवाले यांच्या देखरेखीखाली हे बांधकाम झाले. 

थोरले बाजीराव पेशवे यांचा पुतळा

बाजीरावांचा महाल, सदर, दफ्तरखाना, फडणीस-चिटणीसांचा फड, जवाहिरखाना आणि भुयाराची विहीर असे शनिवारवाड्यातील पहिल्या टप्प्याचे बांधकाम झाले होते. पूर्वी पेशव्यांचे कुटुंब लहान होते; मात्र कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढल्यामुळे वाड्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत वाड्याला तटबंदी करण्याचे ठरविले; मात्र पुण्यामध्ये पेशव्यांनी कोट बांधला, तर सिंहगडाला शह बसेल अशी भूमिका घेत सचिवांनी छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे तटबंदीचे बांधकाम थांबविण्याचे आदेश आले; मात्र नानासाहेबांनी छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन वाड्यावर शत्रूकडून घातपाती कृत्ये, तसेच हल्ला होऊ शकतो हे ध्यानात घेऊन तटबंदी उभारण्यात येत आहे, असे स्पष्ट केले. त्यानंतर परवानगी मिळाली आणि पायाच्या दगडकामावर विटांचे बांधकाम करून तटबंदी उभारण्यात आली. शनिवारवाड्याची इमारत २१ फूट उंच होती आणि तिच्या चारही बाजूंनी ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत होती. ही भिंत आणि बुरूज आजही पुण्यातील मध्य वस्तीत दिमाखाने उभे आहेत. 

वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरूज आहेत. येथून जवळूनच मुठा नदी वाहते. तटाला नऊ बुरूज असून सर्वांवर तोफा बसवण्याची सोय केलेली आहे. यांपैकी ‘पागेचा बुरूज’ आतून पोकळ असून, त्याच्या पायथ्याशी मध्यभागी बांधून काढलेला एक गोल खड्डा आहे. त्यात तोफांचे गोळे ठेवत असत. तटबंदीला पाच दरवाजे असून, त्यांना अनुक्रमे दिल्ली, अलीबहाद्दार किंवा मस्तानी, खिडकी, गणेश, नाटकशाळा उर्फ जांभूळ दरवाजा ही नावे आहेत. सर्व दरवाजे टोकदार कमानींमध्ये असून, मोठे अणुकुचीदार लोखंडी खिळे व जाडजूड पट्ट्या ठोकून ते भक्कम केलेले आहेत. 

दिल्ली दरवाज्याची उंची २१ फूट असून, रुंदी १४ फूट आहे. हाच सर्वांत मोठा दरवाजा आहे. हा दरवाजा अजून सुस्थितीत आहे. वाड्याच्या सर्व तटांवर मिळून २७५ शिपाई, रात्रंदिवस ५०० स्वार व वाड्यातील अंतर्गत बंदोबस्तासाठी एक हजाराहून अधिक नोकर होते.

शनिवावाड्यात १८०८, १८१२, १८१३ या वर्षी छोट्या-मोठ्या आगी लागल्याच्या नोंदी सापडतात, तर १७ नोव्हेंबर १८१७ रोजी वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण लागले. त्यानंतर पुण्याचा पहिला कलेक्टर हेन्री डंडास रॉबर्टसन येथे काही काळ राहत होता. त्यानंतर वाड्यात तुरुंग, पंगुगृह, पोलिसांची निवासस्थाने होती. १८२८मध्ये वाड्यास मोठी आग लागली व आगीत बहुतेक सर्व इमारती जळाल्या. पुढे तब्बल ९० वर्षांनी वाड्याची दुरवस्था संपण्याचा योग आला. 

१९१९मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला व वाड्याचे उत्खनन करण्यास सुरुवात झाली. त्या काळी वाड्यात कोर्टासाठी वापरण्यात येणारी इमारत १९२३पूर्वी उत्खननासाठी पाडण्यात आली. शनिवारवाड्यासंबंधी अनेक घटना, दुर्घटना आहेत. वाड्यातील पेशव्यांच्या कार्यालयात अनेक वीर आणि मुत्सद्दी येत. राजकारणाचे फड येथे रंगत; पेशव्यांचा दरबार येथेच होता. पेशव्यांच्या घरांतील मुला-मुलींची लग्ने याच वाड्यात होत. शनिवारवाड्यासमोरील पटांगणात मोहिमेला जाणारे सैन्य जमे. पुढे जाहीर सभा होऊ लागल्या. आचार्य अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ याच पटांगणातून लढवली. वाड्याच्या पटांगणातील मारुतीस सभामंडप होता. हे मंदिर लॉइड्ज पूल (हल्लीचा नवा पूल किंवा शिवाजी पूल) बांधणाऱ्या केंजळ्यांनी बांधले. मंदिरात १९ मार्च १९२४ रोजी मारुतीची मूर्ती बसविण्यात आली. हा मारुती बटाट्या मारुती म्हणून प्रसिद्ध आहे.

दिल्ली दरवाजा

दिल्ली दरवाज्यावर नगारखाना आहे. आगीच्या प्रलयातून वाचलेला अस्सल पेशवेकालीन शाबूत असलेला भाग हा एवढाच. देवडीच्या भिंतीवर शेषशायी विष्णू, गणपती या दैवतांची चित्रे काढली आहेत. ती आता बरीच खराब झाली आहेत. वाड्याच्या आतल्या भागांमध्ये काय चालले आहे, हे बाहेरच्या माणसांना दिसू नये म्हणून दिल्ली दरवाजा, देवडी आणि आतला चौक नागमोडी रचनेत आहे. शनिवारवाड्यातील गणेश रंगमहाल नानासाहेब पेशव्यांनी १७५५मध्ये बनवून घेतला. गणेशोत्सव भव्यदिव्य प्रमाणात साजरा करता यावा हा त्यामागचा उद्देश होता. येथे एका वेळी शंभर नर्तकी नृत्य करू शकत असत. महालाच्या एका टोकाला सोन्याचा पत्रा असलेली संगमरवरी गणेशमूर्ती होती, तर दुसऱ्या टोकाला कारंजी व सुंदर फुलबाग होती. फुलांचा सुगंध व कारंज्यांचा नाद यामुळे महालात बसणे हा सुखद अनुभव असे. 



पुण्यातील पेशवे दफ्तरात पेशव्यांच्या खजिन्याची मोजदाद दिलेली आहे. या कागदपत्रांनुसार पेशव्यांच्या शनिवारवाड्यातील रत्नशाळेत ५१ हजार ४०२ हिरे, ११ हजार ३५२ माणके, २७ हजार ६४३ पाचू, एक लाख ७६ हजार ११ मोती, ४३५ नीलम, ४३२ वैडुर्य, ४१७ पुष्कराज, ७५ गोमेद, ४४४ पोवळी, ३७८ करड्या, १५६२ पिरोजा, १९१२ करिपोला (कोरल), ४९७ लसण्या असे मौल्यवान खडे होते. यातील बहुतांशी खजिना इंग्रजांनी चोरून नेला. उरलेला खजिना बाजीरावानंतर त्याचा दत्तक पुत्र नानासाहेब याला मिळाला. कानपूर आणि विठूर-ब्रह्मावर्तमध्ये पराभव झाल्यानंतर नानासाहेबांना हा खजिना सोबत नेणे शक्य नव्हते. अतिमौल्यवान जडजवाहीर सोडून राहिलेला खजिना त्यांनी तेथील एका विहिरीत लपवला. इंग्रजांना हेरांकडून त्याची माहिती मिळाली. त्यांनी तो खजिना बाहेर काढला. कर्नल गॉर्डन अलेक्झांडर याने लिहून ठेवलेल्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. त्यात ३० लाख रुपयांची सोन्या-चांदीची नाणी, ताटे, वाट्या, इतर भांडी, कित्येकशे शेर वजनाची चांदीची अंबारी आणि ७० लाख रुपयांचे दागिने, जडजवाहिरे असा एकूण एक कोटी रुपयांचा खजिना त्या वेळी ब्रिटिशांना मिळाला होता.

(माहिती संकलन : संजीव वेलणकर)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZSTCI
Similar Posts
... आणि शनिवारवाड्याचा मुख्य दरवाजा उघडला! पुणे : पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या वर्धापनदिनानिमित्त २२ जानेवारी २०२० रोजी शनिवारवाड्याचा मुख्य दरवाजा अनेक वर्षांनी उघडण्यात आला. बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अनेक इतिहासप्रेमी नागरिकांसह पेशव्यांचे वंशज सहभागी झाले होते.
पानिपतच्या तिसऱ्या लढाईला २५९ वर्षे १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपतची तिसरी लढाई झाली. त्या युद्धात मराठ्यांचा पराजय झाला असला, तरी त्यांच्या पराक्रमाचे, बलिदानाचे मोल कमी होत नाही. या लढाईला २५९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने त्याबद्दल थोडेसे...
पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजला १३६ वर्षे शिक्षणाचे माहेरघर ही पुण्याची ओळख सार्थ करणाऱ्या व पुण्याचा मानबिंदू असणाऱ्या फर्ग्युसन कॉलेजचा दोन जानेवारी हा वर्धापनदिन.
दिनदर्शिकेतून उलगडले ‘स्मरणरम्य पुणे’ राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि ऐतिहासिक शहर असा नावलौकिक असलेल्या पुण्याच्या जुन्या आठवणी जागवणारी ‘स्मरणरम्य पुणे’ ही दिनदर्शिका नुकतीच प्रकाशित झाली आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील पुण्यातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी, वाड्यांसारख्या वास्तूंचे सौंदर्य टिपणारी, तसेच महात्मा गांधी, इंदिरा गांधी, बॅ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language